नवी दिल्ली : जर इराणने माझी हत्या करवली, तर अमेरिकाइराणचा सर्वनाश करेल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, इराणने यापूर्वी ट्रम्प यांना देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केल्यास, परिणाम भोगावे लागतील, असे म्हटले होते. ट्रम्प यांनी खमेनी यांच्या जवळजवळ ४० वर्षांच्या राजवटीचा अंत करण्याचे आवाहन केल्यानंतर, काही दिवसांतच इराणने हा इशारा दिला होता.
"...तर त्यांना नकाशावरूनच मिटवून टाकू"
न्यूज नेशनच्या "केटी पावलिच टुनाईट", या कार्यक्रमाला दिलेल्या एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, "माझा इशारा आहे की, जर काही घडले तर त्यांना नकाशावरूनच मिटवून टाकू." तसेच, इराणी सशस्त्र दलाचे प्रवक्ते जनरल अबोलफझल शेखारची म्हणाले, "ट्रम्प यांना माहिती आहे की, जर आमच्या नेत्यांकडे कुणी हातही केला, तर आम्ही त्याचा हातच उखडणार नाही, तर त्याचा सर्वनाशकरू"
तत्पूर्वी, ट्रम्प म्हणाले होते की, जर इराणने त्यांची हत्या केली तर त्यांनी त्यांच्या सल्लागारांना इराण पूर्णपणे नष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
"...तर तो हल्ला, इराणविरुद्धचे पूर्ण युद्ध मानले जाईल"
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनीही अमेरिकेवर अमानवीय निर्बंधांचा आरोप करत म्हटले आहे की, "सुप्रीम लीडरवरील कोणताही हल्ला हा इराणविरुद्धचे पूर्ण युद्ध मानले जाईल." दरम्यान, २८ डिसेंबरपासून इराणमध्ये ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरून सुरू असलेल्या निदर्शनांवर तेथील प्रशासनाने हिंसक कारवाई केल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.